गत काही वर्षात शहरातील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. तसेच वाहतुक नियंत्रणाबाहेर गेली आहे. मेट्रो, मोनो रेल यासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सक्षम करण्यासाठी हालचालीही सुरू आहेत. मात्र, नियंत्रणाबाहेर गेलेल्या वाहतुकीसाठी शाश्वत पर्याय ठरणाऱ्या 'हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूटच्या अंमलबजावणीचा [रिंगरोड ] मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
या 'हाय कॅपेसिटी मास्ट ट्रांझिस्ट रूट'चा आराखडा पूर्णत्वाला आला आहे तसेच निधीविषयक प्रश्नही सुटला आहे. त्यामुळे आता तात्काळ या रिंगरोडचे काम सुरु करणे आवश्यक आहे. मागील ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेला पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे व खडकी कॅंटोन्मेंट अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर) हा नागरिकांना दिलासादायक ठरणार आहे. मी गेली ११ / १२ वर्षे या एचसीएमटीआर रस्त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. या रिंगरोड उभारणीसंदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यामुळे आता प्रत्यक्ष काम सुरु होणे अपेक्षित आहे.
एकूण ३६.६ किलोमीटर लांबीचा असणारा हा रस्ता संपूर्ण इलेव्हेटेड असणार आहे. रुंदी २४ मीटरची असणार आहे. या मार्गावर ६ मार्गिका (लेन्स) असणार आहेत. त्यापैकी २ बीआरटीसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. विशेषत: राष्ट्रीय महामार्गांना हा रस्ता जोडला जाणार आहे. इलेव्हेटेड असणाऱ्या या मार्गावर बीआरटीसाठी २८ स्थानके असणार असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि यांत्रिक जिने (एलेव्हेटर्स) यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी ४० वर्षात वाहतुकीत होणाऱ्या वाढीचे प्रमाण लक्षात घेऊन या मार्गाचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गावर वाहनांची वेगमर्यादा ५० किलोमीटर प्रति तास एवढी निश्चित करण्यात आली आहे. तसेच या रस्त्यावर दुचाकींना पूर्णपणे बंदी असणार आहे.
सन २०१९ पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मार्गासाठी ७२ हजार ३४६. ८१६ चौरस मीटर क्षेत्र अधिग्रहित करण्यात आले आहे.
हा रिंग रोड आता मार्गी लागणार असल्याने पुणेकरांना शहरांतर्गत भेडसावणारा वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीचा प्रश्न सुटण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होईल. त्यामुळे आपण प्रत्यक्ष लक्ष घालून हा रिंगरोड मार्गी लावावा आणि पुणेकरांना सुरक्षित वाहतुकीसाठी दिलासा द्यावा, ही नम्र विनंती .